वर्धा: भूजल पातळी १.२५ मीटर खालावली; धरणांत ५९ टक्के साठा

वर्धा: पावसाळा संपल्यानंतरही वर्धा जिल्ह्यात पाणीटंचाईचे संभाव्य संकट गडद झाले आहे. भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या पाहणीनुसार जिल्ह्यातील विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत गतवर्षाच्या तुलनेत सरासरी १.२५ मीटरने घट झाली आहे. जिल्ह्यातील ३३ प्रमुख प्रकल्पांमध्ये केवळ ५९.४० टक्केच जलसाठा शिल्लक राहिला आहे. वर्धा जिल्ह्यात आगामी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गतवर्षी याच कालावधीत या प्रकल्पांमध्ये ९५.४६ टक्के साठा होता. सध्या ३३ प्रकल्पांत एकूण ३३५.४३ दलघमी पाणी शिल्लक आहे. निम्न वर्धा प्रकल्पात १२३.१८ दलघमी (५६.८० टक्के), बोर धरणात ६९.५३ दलघमी (५४.५७ टक्के) आणि धाम प्रकल्पात ४९.२६ दलघमी (७८.८१ टक्के) साठा आहे. ग्रामीण भागातील विहिरी आणि कूपनलिकांनी आतापासूनच तळ गाठण्यास सुरुवात केली आहे.
अप्पर वर्धा धरण ४० टक्क्यांवर; रब्बी हंगाम धोक्यात
अप्पर वर्धा धरणात सुमारे ४० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे; गतवर्षी याच काळात तो ९९ टक्क्यांहून अधिक होता. धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवण्यात आले असून, रब्बी हंगामातील सिंचनासाठी पाणी सोडणे शक्य नसल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील रब्बी हंगाम धोक्यात आला आहे.
विदर्भातील धरणांमध्ये एकूण ५४ टक्केच जिवंत साठा शिल्लक असून, गतवर्षी याच काळात तो ८८ टक्के होता. उपलब्ध पाणीसाठा पुढील सात महिने पुरविण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. पावसाचे प्रमाण असमान राहिल्याने भूगर्भातील पाणीपातळीत म्हणावी तशी वाढ झालेली नाही, त्यामुळे पाण्याचे नियोजन आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Post a Comment