नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र माहूरगडावर आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. ११ ते २० ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या या उत्सवात रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. नवरात्राच्या पहिल्याच दिवशी माहूरगडावर दर्शन रांगांमध्ये भाविकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली.
भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत दर्शन मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली असून, आरोग्य, सुरक्षा, वाहतूक, स्वच्छता, पाणी व वीज या सर्व सुविधांमध्ये कोणतीही कुचराई होऊ नये, असे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. बैठकीला सहधर्मादाय आयुक्त तथा संस्थानच्या पदसिद्ध अध्यक्षा हिराबाई शेळके आणि पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
नवरात्रोत्सवादरम्यान भाविकांच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या १२० एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सुरक्षेसाठी ५०० हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड तैनात राहणार असून, गर्दी नियंत्रण, दर्शन रांगा आणि वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. आरोग्य सुविधांसाठी ग्रामीण रुग्णालयातील ४० पैकी २० खाटा यात्रा व्यवस्थेसाठी राखीव ठेवण्यात येणार असून, दत्तशिखर, अनुसया माता आणि रेणुकामाता मंदिराच्या पायथ्याशी आरोग्य पथके व रुग्णवाहिका तैनात राहणार आहेत.
मुख्य बातें
- ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान माहूरगडावर शारदीय नवरात्रोत्सव; रेणुका माता दर्शनाला भाविकांची गर्दी
- भाविकांच्या वाहतुकीसाठी १२० एसटी बसेसची विशेष व्यवस्था
- ५०० हून अधिक पोलीस व होमगार्ड तैनात; २००० हून अधिक अधिकारी-कर्मचारी सेवेत
- ग्रामीण रुग्णालयातील २० खाटा राखीव; मंदिर परिसरात आरोग्य पथके व रुग्णवाहिका
- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक; सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
Comments
Post a Comment